शिफ्ट ड्युटी आणि माणसाचे आयुष्य
यापूर्वी औद्योगिकीकरणाच्या आधी पाळ्यांमध्ये काम करण्याचा (शिफ्ट ड्यूटी) विशेष प्रश्न नव्हता, पण व्यापक औद्योगिकीकरण झाल्यानंतर काम करणं अपरिहार्य ठरू लागलं. आता तर जागतिकीकरणामुळे आऊटसोर्सिंग व इतर प्रकारची कामं भारतात येऊ लागल्यामुळे पाळ्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातल्या एकूण लोकसंख्येचा पांचवां हिस्सापाळ्यांमध्ये काम करतो.पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो तसेच त्यांना झोपेसंबंधीचे विकार जडतात. हे वेगवेगळ्या अभ्यासातून स्पष्ट झालेय. याचा एकूण परिणाम कामगारांच्या कार्यक्षमतेवर होत असतो.
परंतु पाळ्यांमध्ये काम करण्याचा माणसाच्या आयुष्यमानावर काही परिणाम होतो का, याविषयी मात्र लोकांमध्ये तीव्र मतभेद होते. परिणाम होतो व होत नाही, अशी दोन्ही प्रकारची मतं याबाबत प्रचलित होती. मात्र पुरावे दोन्ही बाजूंकडून देण्यात येत नव्हते.
मात्र आता रविशंकर विद्यापीठाच्या अतनू कुमार पती आणि के. वेणू अचरी यांनी पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या आयुष्यमानावर काय प्रभाव पडतो, याचा अभ्यास केला. दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेच्या (नागपूर) येथील कर्मचाऱ्यांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात गेल्या २५ वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या ५९४ कामगारांच्या माहितीचं विश्लेषण केलं गेलं. या ५९४ कामगारांपैकी २८२ कामगार दिवसपाळीत काम करणारे तर ३१२ पाळ्यांमध्ये काम करणारे होते. दिवसपाळीत काम करणाऱ्या कामगारांच्या पाळ्यांच्या वेळी सकाळी ८ ते संध्याकाळी ४, संध्याकाळी ४ ते रात्री १२ व रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत अशा होत्या. एक पाळी सात दिवसांची असायची. त्यानंतर एक दिवस रजा घेऊन पाळ्यांची वेळ बदलली जायची.
या अभ्यासात कामगारांच्या जन्मतारखांचं, सेवानिवृत्तीचं वय तसेच मृत्यूचा दिनांक यांचं विश्लेषण करून सरासरी वयोमान पाहिलं गेलं. यातून लक्षात आलं की,पाळ्यांत काम करणाऱ्या कामगारांचं सरासरी वय हे नेहमीच्या एकाच पाळीत काम करणाऱ्या कामगारांपेक्षा चार वर्षांनी कमी आहे.
या आधी लिहिला गेलेला ब्रिटिश अहवाल पाळ्यांचा माणसाच्या आयुष्यमानावर प्रभाव पडत नाही तर डेन्मार्कमधील अहवाल पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १.१ टक्के मृत्यूचा जास्त धोका असतो, असं सांगतो. पण या दोन्ही अभ्यासात सरासरी वयोमान लक्षात घेण्यात आलं नव्हतं. पण भारतातील अभ्यासात त्याचा विचार केला गेला आहेच, शिवाय तो एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केला गेला आहे.
लेखक : पंकज कालुवााला.
Post a Comment