रोल्स रॉईसच्या कचरा गाड्या ! अल्वरच्या महाराजांची कहाणी

 




                       देखणी बायको दुसऱ्याची!', 'घर की मुर्गी दाल बराबर", अशा म्हणी आपण नेहमी ऐकत-वाचत असतो. ह्या म्हणींना अनुसरून बरचसं कार्यही करीत असतो. विविध वस्तुंचं उत्पादन करण्याची क्षमता असूनही व चांगली देशी उत्पादनं बाजारात असतानाही विदेशी वस्तुंचा हव्यास आपण भारतीय नेहमीच धरीत असतो. खरंतर तो आपला स्वभावविशेषच बनलाय की काय, अशी परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीची जाणीव झाली, की मग अल्वरच्या महारांजांची-जयसिंहाची आठवण प्रकर्षाने होते. 

                          अल्वरच्या महाराजांचा जीवनकाळ हा भारताच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या काळात येतो. ह्या काळात भारतातले छोटेमोठे संस्थानिक ब्रिटिशांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत असतानाही महाराज जयसिंह मात्र आपला आब, आपला स्वाभिमान राखून असत. भारतीय संस्कृती व परंपरेचा त्यांना अभिमान होता. अल्वरच्या मेयो कॉलेजात प्रवेश घेतल्यावर पहिल्या दिवशी ते आपल्या राजेशाही परंपरेला अनुसरून, सजविलेल्या हत्तीवर-अंबारीत बसून कॉलेजात दाखल झाले. गजराजासह अशा रितीने त्यांना कॉलेजात दाखल झालेलं पाहून, गोऱ्या साहेबांची पोरं पण तोंडात बोटं घालून पहात राहिली. आज आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलायला, मराठी- हिंदीतून बोलतानाही मधूनच इंग्रजी शब्दांची पेरणी करायला आवडतं. पण ह्या अल्वरच्या महाराजांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असूनही ते गोऱ्या साहेबांबरोबरही संस्कृतमधूनच बोलायचे. महाराजांनी आपला हा खाक्या शेवटपर्यंत सोडला नाही. 

                     हे महाराज एकदा लंडनला गेले होते. तेथे ते एका दिवशी संध्याकाळी  साध्यासुध्या पोषाखात फेरफटका मारण्यासाठी निघाले. फिरता फिरता ते लंडनच्या बॉन्ड स्ट्रीटवर आले. ह्याच रस्त्यावर रोल्स रॉईस ह्या प्रख्यात मोटारगाडीच्या कंपनीचं एक दुकान होतं. रोल्स राईस कंपनीचा दबदबा त्यावेळी जगभरात होता. साहजिकच महाराजांना मोटारगाड्या पहाण्याची इच्छा झाली. ते तसेच दुकानात दाखल झाले. त्यावर त्यांना काय अनुभव यावा ? साध्यासुध्या कपड्यांत दुकानात गेलेल्या महाराजांना तेथल्या ब्रिटीश व्यवस्थापकाने बाहेर जाण्यास फर्मावलं. तर तेथे असलेल्या इतरांनी त्यांची कुचेष्टा करण्यास सुरूवात केली. महाराज तेथून परत निघाले, ते मनाशी काहीतरी ठाम निश्चय करूनच. हॉटेलमध्ये परत पोहोचल्याबरोबर त्यांनी रोल्स रॉईसंच्या त्याच दुकानात फोन केला. तेथे त्यांनी अल्वरचे महाराज मोटारगाड्या खरेदी करण्यांसाठी येणार असल्याचा निरोप सोडला. थोड्या वेळानंतर राजेशाही  पोषाखातल्या अल्वरच्या महाराजांचं आगमन दुकानात झालं. आता मात्र एखाद्या राजेशाही पाहुण्याचं व्हावं, तसच महाराजांचं स्वागत करण्यात आलं. मात्र ह्या स्वागताला महाराजांनी विशेष महत्त्व दिलं नाही. त्यांचा संकल्प दुसराच होता. त्यावेळी त्या दुकानात सहा रोल्स रॉईस गाड्या उभ्या होत्या. महाराजांनी त्या सगळ्याच तत्काळ खरेदी केल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर ह्या मोटारी जहाजाने भारतात पाठविण्याचा खर्चही त्यांनी तेथल्या तेथे दिला. 

                            एवढ्या सगळ्या गाड्या स्वत:च्या दिमतीला ठेवून महाराजांना इंग्रजांचं नाक ठेचायचं होतं का? तशा प्रकारे ते ठेचताही आलं असतं. कारण एक रोल्स राईस गाडी दारात असणंही जगभरात प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. महाराजांकडे तर सहा-सहा रोल्स रॉईस गाड्या आल्या होत्या. पण महाराजांच्या मनात काही औरच विचार होता. त्यांनी ह्या सगळ्या गाड्या अल्वर नगरपालिकेला भेट देऊन टाकल्या. त्यावेळी अल्वर संस्थानाचं क्षेत्रफळ ८,३२० चौरस किलोमीटर होतं. अल्वर संस्थानातला सगळा कचरा वाहून नेण्यासाठी ह्या गाड्यांचा उपयोग करण्यात यावा, असं फर्मानही महाराजांनी लागलीच सोडलं. एवढंच नाही, तर ते व्यवस्थित अंमलात यावं ह्याकडेही जातीने लक्ष पुरविलं. 

               रोल्स राईससारख्या जगातल्या अव्बल दर्जाच्या कंपनीच्या गाड्या कचारागाडीसारख्या वापरण्याचा हां निर्णय खळबळजनक होता. महाराजांच्या ह्या निर्णयाची वार्ता भारताची सरहद्द ओलांडून इतर देशातही वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एकेकाळी आदरयुक्त दंबदबा असलेली रोल्स रॉईस कंपनी सगळ्यांच्या चेष्टेचा विषय बनली. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कंपनीच्या गाड्यांचा खप कमी व्हायला लागला. त्या धक्कादायक प्रकाराने कंपनीच्या संचालकांचे धाबे दणाणले. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागणारा टेलिग्राम तर त्यांनी पाठविलाच पण जाहीर माफीनामा प्रसिद्ध करून महाराज जर-गाड्यांचा.कचरागाडीसारखा वापर थांबबत असतील तर आणखी सहा नेव्या गाड्या विनामूल्य त्यांना देण्याची तयारीही त्यांनी दाखविली. अर्थात तशी तयारी कंपनीने दाखविली तरी महाराज लगेचच बधले नाहीत. ह्या इंग्रजांची पुरती खोड मोडल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी त्या गाड्यांचा वापर थांबविला. 

                           अर्थात पुढे जेथे जेथे अल्वरच्या महाराजांना संधी मिळाली, तेथे तेथे त्यांनी इंग्रजांची खोड मोडली. देशभक्ती नसानसात भिनलेल्या महाराजांना त्याची तितकीच मोही किंमतही चुकती करावी लागली. १९३३ सालीच ब्रिटीश सरकारने त्यांना पदच्युत केलं, एवढंच नव्हे तर देशातून कायमचं हद्दपार करून फ्रान्सला पांठवून दिलं. तेथेच, मातृभूमीपासून दूर त्यांचं चार वषनिंतर निधन झालं. मात्र महाराजांवरील जनतेचं प्रेम काही कमी झालं नव्हतं. महाराजांचं अंत्यदर्शन व्हायला हवं, ह्या जनतेच्या मागणीपुढे झुकून ब्रिटीश सरकारने रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यांचा मृतदेह जतन करून विमानाने भारतात आणण्याची व्यवस्था केली.


                                                                                         लेखन : पंकज कालुवाला


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.