बुलेटप्रूफ जॅकेटचा शोधक : कासिमीर झेग्लेन
बुलेटप्रूफ जॅकेट हे एक मोठंच जीवनरक्षक साधन आहे, यात शंका नाही. या जॅकेटचा शोधक आहे तो कासिमीर झेग्लेन नावाचा पादरी. हे बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याचा पक्का निर्णय झेग्लेनने घेण्यापाठीमागेही एक घटना आहे. ती घटना घडली होती १८९३ साली. अर्थात त्याही आधी अशा प्रकारचं बंदुकांच्या गोळ्यांपासून संरक्षण करणारं जॅकेट तयार करण्याचे प्रयत्न होत होतेच. जसं १८९२ साली सॅन फ्रान्सिस्को शहरात एका जवाहिऱ्याच्या दुकानावर दरोडा घालताना दरोडेखोर धातूच्या जाड्या पत्र्याचं चिलखत घालून आले होते. अर्थात त्यामुळे त्यांचं संरक्षण होत असलं तरी त्यांच्या हालचालींवर मर्यादा पडत होत्या. हेर दॉव नावाचा कलाकारही अशाच प्रकारे अंगावर पिस्तुलाच्या गोळ्या झाडून घ्यायचा खेळ करून दाखवायचा. पण त्याच्या चिलखतात तो सिमेंटसारखा पदार्थ वापरत असे हे नंतर उघडकीस आले. अर्थात या प्रयोगांना तसा काही खूप अर्थ नव्हता. पण २८ ऑक्टोबर १८९३ च्या रात्री घडलेल्या त्या हत्येच्या घटनेने, बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने बळ दिलं. ही घटना घडली होती शिकागो शहरात. हत्या झाली होती ती शिकागो शहराचे महापौर कार्टर हॅरिसन यांची. त्यांच्या राहत्या घरात ते झोपलेले असताना. एका औद्योगिक मेळ्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेवरून हॅरिसन यांचे पोलीस प्रमुख युजेन प्रेन्डरगेस्ट यांच्याबरोबर खटके उडाले होते. त्याचाच राग मनात ठेवून प्रेन्डरगेस्ट याने त्यांच्या झोपण्याच्या खोलीत शिरून आपल्या रिव्हॉल्वरमधून त्यांना गोळ्या घातल्या. गोळ्या वर्मी लागल्याने हॅरिसन यांचा जागीच मृत्यू झाला.
कार्टर हॅरिसन हे शिकागोमधलं मोठं प्रस्थं होतं. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात धर्मगुरु म्हणून कासिमीर झेग्लेनचाही समावेश होता. मात्र धर्मगुरु असलेल्या झेग्लेनच्या मनात धार्मिक आत्मशांतीऐवजी वेगळेच विचार चालले होते. हॅरिसन यांच्या कपड्यांनीच गोळ्यां रोखण्याचं काम केलं असतं तर.. अशा प्रकारचे ते विचार होते. एका धर्मगुरुच्या मनात असे विचार यावेत. हाही नियतीचा एक अजब खेळ होता. पण मनात विचार आल्यावर त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा धर्मगुरु भिडला खरा. अर्थात झेग्लेनसाठी तरी हे काम तितकेसे सोपे नव्हते. झेग्लेन हा मूळचा पोलंडचा रहिवासी होता. त्याला इंग्रजी जवळजवळ येतच नव्हतं. शिवाय त्याला अमेरिकेत येऊन थोड्याच महिन्याचा काळ लोटला होता. त्यातून भर म्हणून तो पडला धर्मगुरु, धर्मगुरुचा विज्ञान तंत्रज्ञानाशी काय संबंध आणि तो आपल्या कामातून त्यासाठी वेळ देणार ती किती?
तरीही झेग्लेन आपला मोकळा वेळ निरनिराळ्या पदार्थांचे गुणधर्म तपासण्यात घालवू लागला. हा अभ्यास करताना झेग्लेनने तीन महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घेतल्या. त्यातली महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे बंदुकीच्या गोळीचा प्रचंड वेग. हा वेग सर्वसाधारणत: सेकंदाला ३०० मीटरपर्यंत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे गोळीच्या प्रचंड वेगाला तोंड देणारं मानवी शरीर खूपच नाजूक असतं. त्याच्या ह्या नाजूकपणामुळेच गोळी वेगाने येऊन शरीरात खोलवर रुतून बसते व प्राणघातक ठरते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रचंड वेगामुळे गोळीला तितकीच प्रचंड शक्ती मिळालेली असते व ही शक्ती गोळी जेथे शरीरावर आपटते तेवढ्याच जागेपुरती केंद्रित होते. त्यामुळे लागणारा धक्का जास्त प्रमाणात बसतो. हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर गोळीचा धक्का शोषून घेणारा पदार्थ वापरून धक्क्याची तीव्रता आपण कमी करू शकतो, असा विचार झेग्लेनने केला. पण हा असा धक्का शोषून घेणारा आदर्श पदार्थ कोणता हा प्रश्नही होताच. पोलादी पत्रा हा एक आदर्श पदार्थ आहे खरा, पण तो अवजड पत्रा अंगावर ठेवून व्यवस्थित हालचाल करणार तरी कशी? म्हणजेच पदार्थ मजबूतही असायला हवा व तो अंगावर ठेवून हालचाल करता यावी इतपत सुटसुटीतही असायला हवा. जास्त खोलात शिरल्यावर झेग्लेनला धाग्यापासून विणलेल्या कपडापासून हवा तो परिणाम मिळविता येईल असं वाटायला लागलं. हे धागे कोणत्या पदार्थापासून बनवायचे हे शोधायच्या मागे तो लागला. त्यासाठी त्याने तीन वर्षे खर्च केली. त्यासाठी तो युरोपच्या सफरीवर गेला.
ऑस्ट्रीयातील व्हिएन्ना शहरातील विणकरांना भेटून त्याने वेगवेगळ्या पदार्थांच्या धाग्यांपासून कापड विणून घेतले. ते घेऊन तो अमेरिकेला आला. तेथे त्याने आपल्याला हवं तसं जॅकेट तयार करून घेतलं. ते वर्ष होतं १८९७ चं. महिना होता जूनचा. झेग्लेनने आपल्या जॅकेटची जाहिरात करायला सुरुवात केली होती. हे जॅकेट कोणत्या धाग्यापासून बनविलेले होते माहितेय. रेशमी धाग्यांच्या कापडापासून. रेशमी कापडाचे एकावर एक असे चार घर झेग्लेनने वापरले होते. त्यामुळे जॅकेटची जाडी झाली होती ३ मिलीमीटर इतकी तर वजन झालं होतं दर चौरस फुटाला २२५ ग्रॅम इतकंच. पण रेशमाचा धागा हा तेवढ्याच वजनाच्या लोखंडी तारेइतकाच मजबूत असतो हे येथे नोंदवायला हवे.
या धाग्यापासून बनविलेलं कापड प्रत्येक चौरस इंचाला पडलेला ४,५०० किलोग्रॅमचा ताण सहन करू शकतं. झेग्लेनने तर चार थर वापरले होते. म्हणजेच चार थरांचं ताण सहन करायचं सामर्थ्य दर चौरस इंचास १८,००० किलोग्रॅम इतकं झालं होतं. त्यामुळेच मृतदेहावर हे जॅकेट चढवून, ४१ कॅलिबरच्या रिव्हॉल्व्हरमधून पंधरा, तेरा व तीन पावलांवरून झाडलेल्या ३० गोळ्यांनाही हे जॅकेट पुरून उरलं. झेग्लेनच्या या जॅकेटला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेतल्या व युरोपातल्या दैनिकांनी झेग्लेनला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली. पण झेग्लेन रोमन कॅथलिक धर्मगुरु असल्याने या जॅकेटचं उत्पादन तसेच विक्री करू शकत नव्हता. शेवटी धर्मगुरुचा हुद्दा त्याने त्यांच्या बिशपची परवानगी घेऊन सोडला आणि झेग्लेन ब्रुलेटप्रूफ क्लॉथ कंपनी सुरू केली.
पुढे त्याच्या जॅकेटांना चांगली मागणी येऊ लागली. तरी त्यातून त्याची खूप मोठी कमाई काही झाली नाही. हळुहळू त्याची कंपनी मांगे पडू लागली. यानंतर कृत्रिम केबल धाग्यांनी बनणाऱ्या बुलेटप्रूफ जॅकेटचं थोड्या वेगळ्या प्रकारे पुनरावर्तन झालं. त्यावर्षी कॅनेडियन संशोधकांनी रेशीमसर्जक प्रोटीन बनवलं व त्याचा वापर केला तो बुलेटप्रूफ जॅकेटसाठीच. कासिमीर झेग्लेनला यापेक्षा मोठी आदरांजली आणखी कोणती असू शकेल!
लेखन : पंकज कालुवाला
Post a Comment